तासगावातील 'त्या' पुलावरुन पाणी : धोकादायक वाहतूक सुरु
वाळवा क्रांती
तासगाव/प्रतिनिधी
तासगावसह पूर्व भागात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने तासगाव येथील जुना सातारा रस्त्यावर असणाऱ्या येरळा नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. गेल्याच महिन्यात 'त्या' पुलावरुन पाणी वाहत असताना एक वयोवृद्ध दांपत्य दूचाकीसह नदीपात्रात वाहून गेले होते. आजही पुलावरुन पाणी वाहत असताना धोकादायक वाहतूक सुरु आहे.
मागील महिन्यात सततच्या मुसळधार पावसाने येरळा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी 'त्या' पुलावरुन पाणी वाहत असताना एक दांपत्य दुचाकीवरुन पूल ओलांडण्याचा प्रयत्न करीत होते. पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. पूल ओलांडू नका अशी येथील लोकांनी त्यांना विनंती केली होती मात्र, निष्काळजीपणाने त्या दांपत्याने पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमावला.
आजही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, 'त्या' पुलावरुन पाणी वाहत असताना निष्काळजीपणे व धोकादायक प्रवास करणाऱ्यांना 'समज' देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.